मुंबई : राज्यात पोलीस खात्यांतर्गत पोलीस शिपाई, चालक अशा सुमारे 18 हजार पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर अखेरची तारीख आहे. मात्र, अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक असताना वेबसाईट सतत हँग होणे किंवा सर्व्हर डाऊन होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गेलेल्या इच्छुकांना भलत्याच संतापाला सामोरे जावं लागत आहे. पोलीस भरतीसाठीचं संकेतस्थळच ओपन होत नसल्याने इच्छुकांची चांगलीच पंचाईत होत आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती होणार आहे. शहर आणि ग्रामीण भागासाठी ही पोलीस भरती होत आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रवेशही सुरू झाले आहेत. मात्र, वारंवार सर्व्हर डाऊन दाखवत असल्याने इच्छुक उमेदवार इतर सायबर कॅफेत जाऊन तिथेही संकेतस्थळ उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तिथेही सर्व्हर डाऊन दाखवले जात आहे. त्यामुळे या भावी पोलिसांची चांगलीच दमछाक होत असून त्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे.
भरतीपासून वंचित राहण्याची भीती
10 नोव्हेंबरपासून राज्यात पोलीस भरतीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुरवातीला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कोणत्या वर्षीचे सादर करावे यावरून उमेदवारांमध्ये बराच संभ्रम होता. आता अर्जांची संख्या मोठी असल्याने किंवा एजन्सीच्या चुकीमुळे पोलीस भरती प्रक्रियेसाठीची वेबसाईट सतत हँग होणे व सर्व्हर डाऊन असण्याची अडचण जाणवत आहे. या अडचणींमुळे भरतीसाठी पात्र असलेले ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहू शकतात, अशी भीतीही उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.
18 दिवसांपासून अडचणी कायम
उमदेवारी अर्ज भरण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांची सायबर कॅफेमध्ये जोर झुंबड उडत आहे. नगर, सोलापूर, औरंगाबाद आणि गडचिरोलीसह सर्वच जिल्ह्यात हे चित्रं दिसत आहे. आज ना उद्या संकेतस्थळ सुरू होईल आणि अर्ज करता येईल या आशवेर गेल्या 18 दिवसांपासून हे तरुण सायबर कॅफेत येत आहेत. सर्व कामधंदा सोडून सायबर कॅफेत आल्यानंतर हाती निराशा येत असल्याने या तरुणांचा संताप अनावर झाला आहे.
15 दिवसांचा वेळ वाढवून देण्याची मागणी
राज्यभरातून लाखो इच्छुक विद्यार्थी या पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज दाखल करत आहेत. पण ज्या संकेतस्थळावरून हे अर्ज भरले जात आहेत. तेथील सर्व्हर डाऊन असल्याचा अनुभव वारंवार या विद्यार्थ्यांना येत आहे. यामुळे आणखी 15 दिवसांचा वेळ अर्ज भरण्यासाठी वाढवून द्यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.