नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. श्रद्धाची निर्घृणपणे हत्या करणारा आरोपी अफताब पुनावाला याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हल्लेखोरांकडे तलवारी होत्या.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारेकरी हे एका संघटनेते कार्यकर्ते आहेत. दरम्यान, पोलिसांनी हवेत फायरिंग केल्याने हल्लेखोर दूर पळाले. नंतर अफताबला घेऊन पोलिसांची गाडी जेलकडे रवाना झाली. पण हल्ला करणाऱ्यांनी पोलीस व्हॅनवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
आफताबची पॉलिग्राफ टेस्ट
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अफताब पुनावाला याची आज पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्याला लॅबमधून जेलमध्ये नेलं जात होतं. या दरम्यान चार-पाच जणांनी हातात तलवार घेऊन अफताबवर हल्ल्याचा प्रयत्न केला. हल्ल्याचा प्रयत्न करणारे हिंदू सेनेचे कार्यकर्ते होते, अशी माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी काढली समजूत
यावेळी हल्लेखोरांनी अफताब ज्या पोलीस व्हॅनमध्ये होता त्या व्हॅनवर तलवारीने हल्ला केला. पोलिसांनी यावेळी त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोर ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांनी हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार्यकर्त्यांकडून तलवारी जप्त केल्या. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.