भुसावळ : शहरातील डॉ.खानापूरकर पिता-पूत्रांविरोधात नऊ महिन्यांच्या बालकाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नऊ महिन्यांच्या बाळावर उपचार करताना डॉक्टर पिता-पूत्रांनी हलगर्जीपणा केल्याने निष्पाप बाळाचा मृत्यू ओढवल्याची घटना सुमारे 5 वर्षांपूर्वी घडली होती. या संदर्भात वरीष्ठ स्तरावर तक्रारी करण्यात आल्या व त्याबाबत चौकशी झाल्यानंतर बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पाटीलमळा भागातील रहिवासी रंजना शैलेंद्र देशमुख यांचा नऊ वर्षीय चिमुकला चेतायू यास प्रकृती अस्वास्थामुळे डॉ.खानापूरकर यांच्या रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर 31 ऑक्टोंबर 2017 ते 9 नोव्हेंबर 2017 दरम्यान डॉ.उमेश खानापूरकर व डॉ.समीर खानापूरकर यांनी उपचार केले मात्र चिमुकल्याचा त्यादरम्यान मृत्यू ओढवला.
पालकांनी केला डॉक्टरांवर आरोप
डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप मृत चिमुकल्याच्या पालकांनी केल्यानंतर या संदर्भात आरोग्य प्रशासन व पोलिस प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. या संदर्भात चौकशी समितीने चौकशी केल्यानंतर त्याबाबत अहवाल दिल्यानंतर तब्बल पाच वर्षानंतर रंजना देशमुख यांनी तक्रार दिल्यानंतर डॉ.खानापूरकर पिता-पूत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.