जळगाव राजमुद्रा : जळगाव महापालिकेत सध्या राजकीय पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात कुठलाही मेळ बसत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पदाधिकारी केवळ ठेकेदारीवर भर देत असून, जनतेच्या समस्यांशी काही देणेघेणे नसल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे. जर निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच कामं करत नसतील, तर मनपावर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
महापालिकेत भाजप, शिवसेना आणि शिंदे गटात ठेकेदारीवरुन वाद सुरु आहे. यावरुन मतभेद वाढले असून गटबाजी निर्माण झाली आहे. भाजपात दोन गट पडले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट हे देखील वेगळेच आहेत. अशा वातावरणात मनपाचे राजकारण अस्थिर झाले आहे. असे असताना मनपात ठामपणे कामे होत नाहीत, जे काही कामे होत आहेत ती बेकायदेशीरपणे होत आहे. काही दिवसांपुर्वी आमदार एकनाथ खडसे यांनी याच कामावर बोट ठेवले होते.
ठेकेदारीतून मनपाचे लचके तोडण्याचे काम
मनपा पदाधिकाऱ्यांच्या मनमानीपणामुळे महापालिका आणि नागरिक वेठीस धरले जात आहे. नगरसेवक असण्यापेक्षा मनपावर तुकाराम मुंडेंसारखा किंवा त्यांच्यासारखा धडाकेबाज अधिकारी नियुक्त करुन मनपाची सूत्रे प्रशासकाकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरु लागली आहे. ठेकेदारीतून मनपाचे लचके तोडत आहे, नागरिक खड्यांमुळे बेजार झाले आहेत. यासह विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत.
मनपाला मिळाले दोन आयुक्त
मनपात चुकीच्या पध्दतीने टेंडर काढले जात आहेत. नियोजनशून्य कारभार नुकताच समोर आला आहे. मनपात आता तर चक्क दोन आयुक्त मिळाले आहेत. प्रशासक आणि राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. मनपाचे काही अधिकारी आता ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे काम करत असल्याचाही आरोप होत आहे.
दोघा मंत्र्यांची दिशाभूल
शिंदे गटातील काही लोक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची दिशाभूल करत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे काही लोक गिरीश महाजन यांची दिशाभूल करत आहे. मनपातील खरी वस्तुस्थिती या नेत्यांपर्यंत पोहचूच शकत नाही. यामुळे चुकीचे निर्णय घेतले जात असून, जनतेत या दोघांबद्दल नाराजी वाढत आहे.