गुजरात विधानसभा निवडणुकीसाठीचं दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यानंतर आता याच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल यायला लागले आहेत. गुजरातमध्ये पुन्हा भाजप बहुमतात येईल, असा अंदाज व्यक्त होतोय. यावेळीही गुजरातमध्ये पुन्हा भाजप बहुमतामध्ये येण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त होत आहे.
‘टीव्ही ९’च्या एक्झिट पोलनुसार, गुजरातमध्ये भाजपला १२८ ते १४९ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर काँग्रेस – ३० ते ४२, आप- २ ते १० आणि अपक्षांना ० ते ३ जागा मिळतील असा एक्झिट पोल रिपोर्ट आलेला आहे.
हिमाचलमध्ये काँग्रेसला संधी मिळणार
P-MARQच्या सर्व्हेनुसार, भाजपला १२८ ते १४८ जागा मिळतील, काँग्रेसला ३० ते ४२ जागा मिळतील आणि आपला २ ते १० जागांवर समाधान मानावं लागेल. दोन्ही सर्व्हेमध्ये भाजपला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, असं एक्झिट पोल सांगत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये असंही सत्ताधारी पक्षाला पुन्हा बहुमत मिळत नाही, असा प्रघात आहे. अंतिम निकालाबाबतच याची स्पष्टता येईल.
२०१७मध्ये अशी झाली लढत
गुजरातेतल्या विधानसभेच्या १८२ जागांमध्ये बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. २०१७मध्ये भाजपने ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसने ७७ जागांवर. ६ जागांवर अपक्षांनी बाजी मारलेली.
कुठल्या विभागात किती मतदारसंघ?
मध्य गुजरातमध्ये ६८ जागा आहेत. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ५४, उत्तर गुजरातमध्ये ३२ आणि दक्षिण गुजरातमध्ये २८ विधानसभा मतदारसंघ आहेत.