जळगाव: जळगाव शहराचे मोठ्या प्रमाणात भीषण अवस्था झालेली आहे. एखाद्या व्यक्तीला ज्या पद्धतीने साडेसाती लागते त्या पद्धतीची साडेसाती लोकप्रतिनिधींच्या अनास्तेमुळे लागली आहे. जळगाव जिल्हा दूध उत्पादक संस्थेच्या निवडणुकांची धामधूम सध्या सुरू आहे मंत्रीपदे घेतल्यानंतर जिल्ह्यातील सत्तेतील दोन्ही मंत्री दूध संघ ताब्यात घेण्यासाठी जोरबैठका मारत आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत असताना त्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी काही एक देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.
दुध संघावर सत्ता काबीज करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन व विरोधी पक्षातील एकनाथराव खडसे यांनी देखील या निवडणुकीत कंबर कसली आहे. मात्र नेत्यांच्या राजकारणात जळगावची सामान्य जनता भरडली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या जिल्हाभरात सुरू आहे. ज्या पद्धतीने नेत्यांनी विविध पद्धतीने दूध संघाच्या मतदानाचा भाव पडला आहे. त्या पद्धतीचा जळगाव शहरातील खड्ड्यांचा भाव देखील नेते पडतील का? हा चिंतनाचा विषय आहे.
रस्त्यावरील खड्डे उठले जीवावर
संपूर्ण जळगाव शहर तसेच ग्रामीण भागापर्यंत खड्ड्यांचा मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे. अनेक निष्पाप नागरिकांचे यामध्ये जीव गेलेले आहे. तरी देखील नेत्यांना पाझर फुटत नाही हे देखील दुर्दैवच आहे. मात्र राज्यात सत्तांतर झालं ज्या नेत्यांनी जळगाव शहराला अनेक आश्वासने दिली होती. त्या नेत्यांकडे आता देखील जळगावकर आशेचा किरण म्हणून पाहत आहे.
मंत्रीपद मिळूनही ठोस कार्यक्रम नाहीच
जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्री आहेत. मंत्रिपदे घेऊन बरेच दिवस झाले. मात्र ठोस असे निर्णय जळगाव शहर व जिल्ह्यासाठी झालेले दिसून येत नाही. जळगाव शहरात समस्यांचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्याचा मध्यवर्ती ठिकाण असताना मात्र जळगाव शहरातील समस्यांकडे कानाडोळा केला जात आहे.