जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले हे २३ जून रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. ते या दौऱ्यात विविध ठिकाणी बैठका घेणार आहेत.
दरम्यान जिल्ह्यातील कॉंग्रेसची स्थिती दयनीय असून संघटना बांधणीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकमत नसल्याने रस्सीखेच सुरु आहे. उघड-उघड दोन गट असल्याने आपला नेता नेमका कोण ? असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करत आहे. नूतन जिल्हाध्यक्ष व कार्यकारणी यामध्ये ताळमेळ नसल्याने दुसऱ्या गटातील कार्यकर्ते पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होत नाही, पक्षाला गतवैभव आणण्यासाठी वरिष्ठ नेते केवळ घोषणाबाजी करून वेळ मारून नेतात परंतु पक्षातील अंतर्गत धुसपूस संपवण्यासाठी कोणीही नेता प्रयत्न करीत नाही, त्यामुळे जिल्ह्याचा पक्ष वाऱ्यावर सोडला आहे का ? असा संभ्रम निर्माण झाला आहे. आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असले तरी त्यांच्या स्वागतासाठी एकाच गटातील कार्यकर्त्यांची फळी सज्ज असून दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांचे म्हणणे प्रदेशाध्यक्ष हे ऐकून घेतील का असा सवाल पक्षाच्या एका माजी पदाधीकाऱ्याने व्यक्त केला आहे. नवीन जबाबदारी मिळाल्यापासून कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते भुसावळ, फैजपूर, अमळनेर आणि जळगावसह काही ठिकाणी भेटी देणार आहेत.
नवीन शहर जिल्हाध्याक्षाची निवड होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले असून मात्र यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.