जळगाव: महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची चोरट्या मार्गाने खुलेआम वाहतूक सुरू आहे. वाळूमाफियांवर कारवाई करण्यास व वाळूचोरी रोखण्यात स्थानिक महसूल प्रशासन अपयशी ठरले असून, जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष घालून वाळूमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. रात्रभर वाळूची वाहतूक सुरू असताना महसूल कर्मचारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महसूल यंत्रणेकडून जप्त करण्यात आलेले वाळू ठिय्ये अवघ्या काही तासात शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराला वितरित केले गेल्याने खळबळ उडाली आहे, तेवढेच नाही तर वाळू ठिय्ये काही तासातच वाहनात भरून वाहतूक देखील केली गेल्याने महसूल विभागातील त्या अधिकाऱ्यांची भुमीका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार सूर्यास्त झाल्यानंतर गौण खनिज वाहतूक करीत शकत नाही. तरी देखील आव्हाने, खेडी, फुफनगरी, निमखेडी या भागातून अंदाजे 1000 ब्रास वाळू वाहतूक अधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात आली आहे. यावेळी तलाठी नन्नवरे यांच्यासह प्रांत अधिकारी कार्यालयातील नाईक यांची टीम कार्यरत होती. घटनाक्रम सुरू असताना प्रांताधिकारी महेश सुरडकर यांचे वाहत घटनास्थळी होते. तरी देखील शासनाच्या नियमाविरोधात वाळू वाहतूक करण्यात आली आहे.
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतोय
गिरणा नदीपात्रालगत असलेल्या गावातून दररोज वाहनांतून बिनधास्तपणे वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. वाळूचोरीमुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. महसूल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून वाळूमाफियांना अभय देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वाळू वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरून भरधाव जात असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे.
शहरासह ग्रामीण भागात अनेक नवीन बांधकामे सुरू असून, वाळूमाफियांकडून ठिकठिकाणी वाळूचे साठे करण्यात आले आहेत. वाळूची टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे. सायंकाळी सातपासून सकाळी आठपर्यंत वाळूची वाहतूक बिनधास्त सुरू आहे. वाळूचोरीस आळा घालण्यात अथवा कारवाई करण्यास स्थानिक महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.