मुंबई : तुमचे आधार कार्ड अपडेट झाले नसेल तर ते लवकर अपडेट करा, अन्यथा सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहाल. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI ने आधार कार्डाबाबत एक अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, जर तुम्हाला कोणत्याही सरकारी किंवा गैर-सरकारी योजनेचा लाभ मिळत असेल तर ते सुरू ठेवण्यासाठी आधार कार्डमध्ये नेहमी POI आणि POA अपडेट ठेवा. तुमचे POI आणि POA अपडेट केलेले नसल्यास ते लवकरात लवकर अपडेट करा.
आधार कार्ड हे आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह दस्तऐवज आहे. प्रत्येक लहान-मोठ्या कामात त्याची गरज असते. अशा परिस्थितीत, ते नेहमी अपडेट ठेवणे देखील आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही.
POIसाठी आवश्यक कागदपत्रे
POI आणि POA ला ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा देखील म्हणतात. 1 जुलै 2022 रोजी आधारने जारी केलेल्या सूचनेनुसार, ओळखीचा पुरावा म्हणजेच POI अपडेट करण्यासाठी नाव आणि फोटो असलेले दस्तऐवज आवश्यक आहे. पॅनकार्ड, ई-पॅन, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, शस्त्र परवाना, फोटो बँक एटीएम कार्ड, फोटो क्रेडिट कार्ड, विवाह प्रमाणपत्र, शेतकरी फोटो पासबुक यासह अशी कागदपत्रे पुरावे म्हणून अद्ययावत करण्यासाठी सादर केली जाऊ शकतात.
POA अपडेसाठी ही कागदपत्रे अनिवार्य
पत्त्याच्या पुराव्यासाठी म्हणजेच POA अपडेटसाठी, असे कागदपत्र आवश्यक आहेत ज्यामध्ये तुमचे नाव आणि पत्ता असेल. यासाठी पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, रेशन कार्ड, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पेन्शनल कार्ड, किसान पासबुक, अपंगत्व कार्ड, मनरेगा कार्ड, वैध शाळा ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वीज बिल, पाणी बिल, लँडलाईन टेलिफोन बिल, पोस्टपेड मोबाईल बिल ही कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करता येतात.
आधार कार्ड अपडेट शुल्क
आधार कार्डमध्ये बरीच माहिती असून प्रत्येक माहिती अपडेट करता येते. नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि भाषा यामध्ये बदल असल्यास ते ऑनलाइन शक्य आहे. मात्र, ऑनलाइन अपडेटसाठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. जर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अपडेट नसेल तर आधी अपडेट करून घ्या. ऑनलाइन अपडेटचे शुल्क रु.25 आहे. फोटो आणि मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर ते ऑफलाइन शक्य आहे. यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते.