यावल : तंत्र-मंत्राव्दारे पैशांचा पाऊस पाडतो व पैसे दुप्पट करून देतो असे सांगत चुंचाळेतील व्यक्तीने साधूची वेशभूषा बदलून कापूरवाडी येथील एकाची 5 लाखात फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच सांगली पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील चुंचाळे येथील दिनेश पाटील याला अटक केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
यावल तालुक्यातील चुंचाळे येथील दिनेश बाळू पाटील या तरुणाचा शोध घेत इस्लामपुरा पोलीस ठाणे जिल्हा सांगली येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे हे आपल्या पथकासह यावल येथे दाखल झाले. यावल पोलिस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, हवालदार नरेंद्र बागुले, शामकांत धनगर, अनिल पाटील, निलेश वाघ आदींन्या पहाटेच्या सुमारास चुंचाळे गावातून दिनेश पाटील याला अटक केली व इस्लामपुरा पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
साधूची वेषभूषा धारण करीत फसवणूक
आरेापी तरुणाने साधुची वेशभूषा बदलून आपण तंत्रविद्या जाणून आहोत, असे सांगत पैशांचा पाऊस पाडतो व पैसे दुप्पट करून देतो असे सांगत कापुरवाडीतील रहिवासी पांडुरंग शिवराम सावंत यांची पाच लाखात फसवणूक केली. ही घटना शनिवार, 3 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी इस्लामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.