जळगाव: शहरालगत शिरसोली रोडवर रायसोनी कॉलेज जवळील त्यांच्या मालकीच्या टेकडीच्या जागेतून वारेमाप गौणखणीत काढण्याचे काम सुरू असल्याचे वृत्तमालिका ‘राजमुद्रा’ने प्रकाशित केल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. रायसोनी कॉलेज जवळील गौण खनिज उत्खनन करण्याचा धडाका सुरू असून परवानगी शेकडो ब्रासची तर उत्खनन हजारो ब्रासचे असे चित्र आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याचे काम महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदाराचा गोरखधंदा सुरू आहे. तहसीलदारांनी या प्रकरणावर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र संबंधित ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न केल्याची शंका महसूल विभागातच व्यक्त होत आहे.
तहसीलदारांनी या ठिकाणी कारवाई केली मात्र केवळ काम थांबवले आहे. वास्तविक महसूलच्या अधिकाऱ्यांच्या मते तहसीलदारांनी डंपर, पोकलेन जप्त केले पाहिजे होते. तसेच मुरूमही जप्त करत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई अपेक्षित होते, परंतु असे काही झाले नाही. त्यामुळे तहसीलदार यांच्याकडून फक्त कारवाईचा फारच झाल्याचा आरोप होत आहे. अशी नाममात्र कारवाई का केली गेली? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. तसेच तहसिलदार नामदेव पाटील प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे याकडे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.
परवानगीपेक्षा जास्तीचे उत्खनन
शहरालगत शिरसोली रोडवर जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाचा परिसर मोठा असून, या परिसरातच महाविद्यालयाच्या मालकीची मुरूम असलेली टेकडी आहे. या ठिकाणाहून काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पोकलेन व जेसीबीच्या साह्याने गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. या उत्खननासाठी परवानगी 200 ब्रासचीच घेण्यात आल्याचे समजते. मात्र दिवसागणित शेकडो ब्रास गौणखनिज वाहले जात आहे. गौण खनिज उत्खन्नासाठी महसूल विभागाकडून परवानगीच्या नावाखाली 200 ब्रासची नाममात्र परवानगी काढण्यात येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज
काही दिवसांपासून येथून दोन मोठ्या डंपरच्या साह्याने रात्रंदिवस गौणखनिज वाहण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे एका डंपरमध्ये सहा ब्रास मुरूम वाहिला जातो. दिवसभरात दोन डंपरच्या सहाय्याने सुमारे वीस फेऱ्या धरल्या तरी दिवसभरात 200 ब्रांच पेक्षा जास्त गौणखनिज वाहिला जातो. याबाबत सत्यता पडताळणी करायची असल्यास महाविद्यालय परिसरात असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यावर याची माहिती मिळू शकेल.
लाखो रुपयांचा महसूल बुडाला
या परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन करत संबंधित कंत्राट महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक संबंध जोडून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत असल्याचे दिसते. प्रत्यक्ष गौण खनिज उत्खनन केलेल्या जागेची मोजणी केल्यावर येथे झालेला प्रकार घडत होईल. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
आठ लाखांचा दंड प्रलंबित
मोठ्या प्रमाणात कायद्याचे उल्लंघन केल्यानंतरही कायदेशीर का कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक याबाबत महसूल विभागाने संबंधित ठेकेदाराला दंड आकारत गुन्हा दाखल केला पाहिजे होता. परंतु राजकीय दवामुळे हे प्रकार धडकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठेकेदारावर धरणगाव तहसील कार्यालयाने अवैध गौण खनिज उत्खनणाबाबत जवळपास आठ लाखांचा आकारलेला दंड प्रलंबित असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.