अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील शेतकरी राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ५०) यांनी गुरुवारी आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले. त्यानंतर राजेंद्र पाटील यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
राजेंद्र पाटील शेतात तुरीवर फवारणी करण्यासाठी गेले होते. सायंकाळी शेतातून घरी परतल्यानंतर त्यांनी फवारणीचे औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. राजेंद्र पाटील यांच्याकडे स्वतःची दोन एकर व भाडेतत्वावर चार एकर जमीन होती.
दीड लाखाचे कर्ज
शेतीसाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडून ३५ ते ४० हजार पीककर्ज, बचत गटाचे ७५ हजार रुपये व मजुरीसाठी ५० ते ६० रुपयांची हात उचल, असे एकूण दीड लाखापर्यंत कर्ज त्यांच्यावर होते. बेमोसमी पाऊस, उशिरा झालेली दुबार पेरणी व त्यामुळे उत्पन्नात होणारी घट लक्षात घेता, कर्जाचा डोंगर चढत असल्याच्या विचारत त्यांनी हे पाऊल उचल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत होती. राजेंद्र पाटील यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून व मुलगी असा परिवार आहे.