मुंबई : भ्रष्टाचार आणि 100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला असला तरी त्यांच्या जामीनाला आता 10 दिवसांची स्थगिती मिळाली आहे. आम्हाला या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची आहे. त्यामुळे 10 दिवस स्थगिती द्यावी अशी विनंती सीबीआयनं उच्च न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस तरी अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. पण उच्च न्यायालयाचा निकाल येताच अनिल देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.
सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान
सीबीआयच्या सत्र न्यायालयानं अनिल देशमुख यांचा जामीन फेटाळला होता. त्याला देशमुख यांच्यावतीनं सत्र न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती आणि सोमवारपर्यंत निकाल राखून ठेवला होता.
ईडीसमोर हजर राहावं लागणार
आज न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी निकाल देताना अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. यात न्यायालयानं काही अटी समोर ठेवल्या आहेत. यात अनिल देशमुख यांना आपला पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा करावा लागणार आहे. तसंच आठवड्यातून दोन दिवस ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.