जळगाव : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण यांनी मंदा खडसे यांचा पराभव करत विजय मिळवला. एकनाथ खडसे यांना त्यांच्याच बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरात भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी आव्हान दिले होते. त्यामुळं ही लढत अटी-तटीची ठरली होती. या निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे आमदार मंगेश चव्हाण जायंट किलर ठरले आहेत.
दूध संघाच्या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथराव खडसे यांची प्रतिष्ठापनाला लागली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी जोर लावला होता. असे असले तरी या निवडणुकीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. आमदार चव्हाण यांनी एकनाथ खडसेंच्या मतदारसंघात जाऊन मंदाकिनी खडसे यांचा पराभव केला. त्यामुळे मंगेश चव्हाण हे या निवडणुकीचे हिरो ठरले आहेत.
दुध संघातील गैरव्यवहार काढला
राज्यात भाजप शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर दूध संघावर आमदार मंगेश चव्हाण यांचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मंगेश चव्हाण यांनी महिन्याभराच्या कार्यकाळात येथील गैरव्यवहार बाहेर काढले होते. त्यानंतर दूध संघाची निवडणूक जाहीर झाली असता, या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन मंगेश चव्हाण हेच हाताळत होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे केवळ काही मेळाव्यांमध्ये प्रचाराला गेले होते.
मुक्ताईनगरातून दणदणीत विजय
आपला हक्काचा चाळीसगाव तालुका सोडून मुक्ताईनगर तालुक्यात थेट खडसेंच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला. यानंतर त्यांनी मंदाकिनी खडसे यांना पराभूत करत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्यापेक्षा आमदार मंगेश चव्हाण यांच्या वियजाची चर्चा सध्या जिल्ह्यात होऊ लागली आहे.