जळगाव : जिल्हा दूध संघाच्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपा-शिंदे गट प्रणित शेतकरी विकास पॅनलने 20 पैकी 16 जागांवर विजय मिळवून महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचा अक्षरश: धुव्वा उडविला. या निवडणुकीत मंदाकिनी खडसे यांचा भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी 76 मतांनी दारूण पराभव केला. एकूणच गेल्या सात वर्षापासूनचे दूध संघातील खडसे पर्व आजच्या निकालानंतर संपले आहे. या विजयामुळे मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांचे बळ वाढले आहे.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाची निवडणूक ‘सहकार’ गटाची असली तरी ती खऱ्या अर्थाने पक्षीय पातळीवर लढली गेली असे म्हटले जाते. माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी होती, त्यांचे सहकार पॅनल तर राज्याचे मंत्री गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गट होता. त्यांचे शेतकरी पॅनल होते.
खडसेंसमोर चव्हाणांचे आव्हान
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्या पॅनलचे नेतृत्व केले, त्यांच्या पत्नी विद्यमान चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी निवडणूक लढविली त्यांच्या विरूध्द चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठे आव्हान उभे केले होते. मंदाकिनी खडसे यांचा तब्बल 76 मतांनी पराभव झाला आहे. खडसे यांना भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यांनी मोठे मताधिक्य दिले.
खडसेंना रणनिती बदलावी लागणार
एरंडोल तालुक्यातही त्यांना चव्हांणांच्या बरोबरीने मते मिळाली परंतु इतर तालुक्यात मात्र त्यांच्या मतांची मोठी घसरण झाली आहे. खडसे यांनी आपली संपूर्ण ताकद या विजयासाठी लावली होती. मात्र, या पराभवातून एकनाथ खडसे यांना राजकारणात सावधानतेचा ईशारा मिळाला आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे खडसे यांना आगामी काळात यशासाठी त्यांना आपले राजकीय पवित्रे बदलावी लागतील.
आगामी निवडणुकीत फायदा?
गिरीश महाजन व शिवसेना शिंदे गटाचे नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे या विजयाने बळ वाढले आहे. सहकार क्षेत्रात गुलाबराव यांच्या या यशाने पर्दापण झाले आहे. तसेच त्यांच्या गटाला तब्बल 15 जागा मिळाल्याने त्यांचे यश अधोरेखीत झाले आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीत याचा फायदा होऊ शकतो.
राष्ट्रवादीला काहीसा दिलासा
जिल्हा बँकेचे अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्या छाया देवकर, राष्ट्रवादी चे माजी खासदार वसंतराव मोरे यांचे चिरंजीव पराग मोरे, अमळनेरचे राष्ट्रवादी चे आमदार अनिल भाईदास पाटील व चाळीसगावचे राष्ट्रवादीचे प्रमोद पांडूरंग पाटील यांच्या विजयामुळे राष्ट्रवादीला काहीसा दिलासा मिळाला आहे.