जळगाव : राज्याचे माजी मंत्री शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुरेशदादा जैन तब्बल पाच वर्षांनंतर आज जळगावात येत आहेत. चाहत्यांतर्फे त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजी मंत्री सुरेशदादा जैन घरकुल प्रकरणानंतर तब्बल पाच वर्षांपासून मुंबई येथे होते. त्यांना न्यायालयाने मुंबई बाहेर पडण्यास मनाई केली होती. मात्र, नुकताच न्यायालयाने कायम जामीन मंजूर केला. त्यांना राज्यात कोठेही जाण्यास मंजुरी दिली. त्यानंतर बुधवारी ते प्रथमच जळगावला येत आहेत. राजधानी एक्सप्रेसने रात्री पावणेनऊला जळगाव रेल्वेस्थानकावर त्यांचे आगमन होणार आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. त्यांनी स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे.
ढोलताशांच्या गजरात मिरवणूक
रेल्वेस्थानकावर त्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट टाकण्यात आली आहे. त्या ठिकाणी त्यांचे औक्षण करण्यात येईल. त्यानंतर रेल्वेस्थानकाबाहेर सनई चौघडे वाजविण्यात येतील, तसेच पंजाबी भांगडा पथक असेल. खानदेश सेंट्रलमार्गे ते गोविंदा चौकात येतील. त्या ठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात येईल. ढोलताशांच्या गजरात ही मिरवणूक पुढे जाईल.
शहरात लागले बॅनर
शहरातील चौकाचौकांत त्यांचे स्वागत करण्यात येईल. शिवसेना ठाकरे गटातर्फेही स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागताचे मोठमोठे फलक लागली आहेत. ढोलताशांच्या गजरात रेल्वेस्थानकापासून ते शिवाजीनगरातील त्यांच्या निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात येईल.