नवी दिल्ली : लोकांची फसवणूक होण्यापासून वाचवण्यासाठी सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. मात्र, त्यानंतरही देशात भेसळयुक्त सोन्याचे दागिने बिनदिक्कतपणे विकले जात आहे. हॉलमार्किंग फेडरेशन ऑफ इंडिया (एचएफआय) ने देखील कबूल केले आहे की काही लोक सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग करून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. फेडरेशनने सरकारला पत्र लिहून बनावट हॉलमार्किंग रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एचएफआयचे अध्यक्ष जेम्स जोस म्हणतात की, सरकारने अद्याप जुन्या हॉलमार्किंग लोगोवर बंदी घातली नाही. याच्या नावाखाली बनावट हॉलमार्किंग करून कमी कॅरेटचे सोन्याचे दागिने ग्राहकांना जास्त कॅरेटचे सांगून विकले जात आहेत. जोस म्हणतात की जुना हॉलमार्किंग लोगो फार सुरक्षित नाही. बनावट हॉलमार्किंग थांबवण्यासाठी सरकारने जुना लोगो वापरण्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी आणि त्यानंतर त्यावर पूर्णपणे बंदी घालावी.
हॉलमार्किंग म्हणजे काय?
हॉलमार्किंग हे सोन्याची शुद्धतेची हमी देते. प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्क चिन्हांकित असतो. त्यामध्ये भारतीय मानक ब्यूरोचा (BIS) लोगो, त्याची शुद्धता याची माहिती अंकित असते. यासोबतच या सोन्याची शुद्धता तपासणी केंद्र आणि इतर माहिती चिन्हांकित असते. प्रत्येक दागिन्यात सोन्याची मात्रा वेगवेगळी असते. दागिन्याची शुद्धता कॅरेट आधारे निश्चित करण्यात येते.
हॉलमार्किंगच्या नियमात बदल
केंद्र सरकारने गेल्या वर्षी 1 जुलै रोजी हॉलमार्किंगच्या नियमात बदल केला होता. हॉलमार्किंगच्या चिन्हांमध्ये बदल केला होता. चिन्हांची संख्या तीन केली होती. पहिले चिन्ह बीआयएस हॉलमार्कचे आहे. हे त्रिकोणी चिन्ह आहे. दुसरे चिन्ह सोन्याच्या शुद्धतेचे आहे. त्यामुळे सोने किती कॅरेटचे आहे, याची माहिती मिळते. तिसरे चिन्ह हे अल्फान्यूमेरिक कोड असते. हे संख्या आणि अक्षरांचं मिळून तयार झालेलं चिन्हं असते. त्याला HUID चिन्ह म्हणतात. या कोडमध्ये अक्षर आणि संख्येचा समावेश असतो. हॉलमार्किंगच्यावेळी ज्वेलर्सला हा क्रमांक देण्यात येतो. हा क्रमांक युनिक असतो.
ॲपद्वारे तपासा हॉलमार्किंग
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने बनवलेल्या बीआयएस केअर ॲप नावाच्या मोबाइल ॲपद्वारे तुम्ही हॉलमार्क केलेले दागिने तपासू शकता. बीआयएस केअर ॲप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला तुमचे नाव, फोन नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागेल. त्यानंतर, तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी OTT द्वारे सत्यापित करणे आवश्यक आहे. पडताळणीनंतरच हे ॲप वापरता येईल. बीआयएस केअर ॲपमध्ये ‘व्हेरिफाय एचयूआयडी’ हे फीचर देण्यात आले आहे. यामध्ये, दागिन्यांवर दिलेला HUID क्रमांक टाकून, दागिण्यावरील हॉलमार्किंग अस्सल आहे की बनावट हे शोधू शकता. तुम्ही खरेदी केलेल्या हॉलमार्क ज्वेलरीबद्दल तुम्ही समाधानी नसल्यास, तुम्ही ॲपच्या पूर्ण विभागात जाऊन तक्रार नोंदवू शकता.