जळगाव: चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एकाचा धारदार शस्त्राने भोसकून एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या संशयातून भावाने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. दगडू वामन खैरनार (गढरी) (वय ५२ रा. मेहुणबारे ह.मु. तिरपोळे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
या संदर्भात दिपक दगा गढरी (वय- ४५) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत गढरी यांनी म्हटले आहे की, त्यांचे मावसा दगडू वामन खैरनार (गढरी) हे त्यांच्या पत्नी लताबाई सोबत राहतात व शेतमजुरी करतात. त्यांना एक मुलगा जगदिश व एक मुलगी आहे. सुमारे ३ महिन्यापुर्वी मावसभाऊ जगदिश याने मेहुणबारे गावातील मुलगी अश्विनी राजेंद्र चव्हाण हिच्या सोबत प्रेमविवाह केला होता. याचाच राग अश्विनी हिच्या परिवाराला होता. सदर प्रेमप्रकरणावरुन दोघं परिवारामध्ये वादविवाद होऊन भांडण झाले होते.
धारधार शस्त्राने मानेवर वार…
दगडू वामन खैरनार (गढरी) हे मेहुणबारे येथे धुळे रोडवरील हायस्कूल समोरील रेशन दुकानातून रेशन घेवून बसस्टॅडकडे पायी जात होते. यावेळी अश्विनीचा भाऊ सचिन राजेंद्र चव्हाण याने मोटारसायकलवर येवून त्याच्या हातातील धारधार हत्याराने दगडू खैरनार (गढरी) यांच्या मानेवर मागील बाजूने वार केला. या हल्ल्यात दगडू खैरनार हे जागीच गतप्राण झाले. दरम्यान, संशयित आरोपीच्या शोधार्थ स्थानिक पोलिसांसह एलसीबीचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.