जळगाव : बेकायदेशीररित्या गावठी बनावटीची पिस्तूल घेऊन दहशत पसरविणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. जळगाव शहरातील अजिंठा चौकातील हॉटेल महाराजासमोर पोलिसांनी ही कारवाई केली. दोघांकडून २० हजार रुपये किंमतीची गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील अजिंठा चौकातील हॉटेल महाराजा परिसरात मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील राहणारे दोन जण हे गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती.
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या, एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यांनी अजिंठा चौकातील हॉटेल महाराजासमोर कारवाई करत संशयित आरोपी अक्षय प्रकाश घारू (वय-२१) आणि नितीन देवी दयाल सालवे (वय-२५) दोन्ही रा. शिवाजीनगर, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश यांना ताब्यात घेतले.
दोघांवर गुन्हा दाखल
त्यांच्याकडून २० हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची पिस्तूल हस्तगत केली आहे. पोलीस नाईक विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहे.