मुंबई : पोलीस दलात शिपाई आणि चालक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पोलीस भरतीतील 18 हजार पदांसाठी 18 लाखांहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज दाखलक करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती. या तारखेपर्यंत 18 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 12 लाख 25 हजार 899 अर्ज आले आहेत. तर चालक पोलीस हवालदार 2 लाख 15 हजार 132 अर्ज आले आहेत.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये पोलीस शिपाई पदाच्या एकूण 17130 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक विभागातील पोलीस शिपाई पदाच्या 14956 आणि चालक पोलीस शिपाई पदाच्या 2174 जागा आहेत. एसआरपीएफ पोलीस शिपाई पदाच्या 1204 पदांवर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले. पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती. आता उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक 22 डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून 2 जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत.
मैदानी चाचणीसाठी जिल्हानिहाय तयारी
मैदानी चाचणीच्या दृष्टीने प्रत्येक शहर-जिल्ह्यात मैदानांची तयारी केली जात आहे. पहिल्यांदा चालक पदांची मैदानी होईल आणि त्यानंतर पोलीस शिपाई पदांसाठी उमेदवारांना बोलावले जाईल. दररोज किमान एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. 19 डिसेंबर रोजी सर्व जिल्ह्यांना त्यांच्या जिल्ह्यातील जागांसाठी नेमके किती व कोणत्या संवर्गातील किती अर्ज प्राप्त झाले आहेत, याची माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पाठवली जाणार आहे. 22 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यांनी ठरवलेले नियोजन पोलीस महासंचालकांना कळवायचे आहे. मंगळवारी (ता. 20) त्यासंबंधी पोलीस महासंचालक बैठक घेतील. त्यानंतर संबंधित उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र पाठविले जाणार आहे. भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमीत कमी राहणार असून भरतीत कोणत्याही प्रकारच्या वशिलेबाजीला वाव राहणार नाही, असे तगडे नियोजन करण्यात आले आहे.
जेथे मैदानी चाचणी तेथेच लेखी परीक्षा
पोलीस भरतीसाठी काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज केले आहेत. पण, त्या उमेदवारांना केवळ एकाच ठिकाणी मैदानी व लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. मैदानी चाचणी झाल्यावर काही दिवसांनी लेखी चाचणी होणार आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेतली जणार आहे. परंतु, उमेदवाराने ज्या शहरात-जिल्ह्यात मैदानी चाचणी दिली, त्याचठिकाणी त्याला लेखी परीक्षा देखील द्यावी लागणार आहे.