जामनेर – तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. आज जामनेर तहसील आवारात मतमोजणीला सुरूवात करण्यात आली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत जवळपासून सर्व निकाल घोषीत झाले असून, तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीं पैकी १० ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.
जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन यांनी सांगितले की, १० ग्रामपंचायती भाजपकडे आल्या असून, उर्वरित २ ग्रामपंचायती सुध्दा आमच्या संपर्कात आहेत. सकाळपासून ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सुकता सर्वांना लागून होती. निकाल घोषीत केल्यानंतर विजयी उमेदवारांसह समर्थकांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला. सर्व विजयी सरपंच व सदस्यांचे नामदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नगराध्यक्ष साधना महाजन तसेच तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, ज्येष्ठ नेते छगन झाल्टे, विधानसभा प्रमुख तुकाराम निकम यांनी सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी न.पा. गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, शहराध्यक्ष आतिश झाल्टे, रवींद्र झाल्टे, तेजस पाटील, सुभाष पवार, गणेश चौधरी,सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.