जामनेर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजय व पराभवाचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले. दरम्यान दगडफेक देखील झाली असून यात भाजप कार्यकत्र्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर देखील भाजपचे वर्चस्व राहिले आहे. या दरम्यान जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश केल्या- केल्याच त्यांच्यावर पराभुत झालेल्या विरोधकांकडुन तुफान दगडफेक करण्यात आली. पोलीसांनी संशयीतांची धरपकड करून सुमारे २०-२५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावामधे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू
टाकळी ग्रामपचायतीच्या निकालानंतर दोन गट भिडले असून काही जणांनी दगडफेक केली. यामुळे गावात दंगलीसारखी परिस्थती निर्माण झाली होती. या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या धनराज श्रीराम माळी (वय ३२) या भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी व प्रचंड आक्रोश केला.