जळगाव : जळगावात खुनाचे सत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. आज पुन्हा एकाचा खून करण्यात आला आहे. जळगावातील या खुनामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून दोन जणांनी एकाला चाकू भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २०) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. या खूनानंतर एक संशयित स्वत:हून पोलीस ठाण्यात जमा झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील जुन्या बसस्थानक येथे जुन्या वादाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणमारी झाली. यावेळी एकावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यात आकाश सुरेश सपकाळे (वय ३०, रा. कोळी पेठ, जैनाबाद जळगाव) या तरुणाचा खून झाला आहे. यामध्ये मयताचा भाऊ सागर सुरेश सपकाळे आणि सागर आनंदा सपकाळे हे दोन जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
संशयित पोलिसात जमा…
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यासह जिल्हापेठ व शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनांसाठी दाखल झाले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराची प्रचंड गर्दी जमली होती. या घटनेनंतर संशयित गोपाल कैलास सैंदाणे (वय ३०, रा. शनिपेठ) स्वत:हून पोलीस ठाण्यात जमा झाला आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.