नागपूर : नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सध्या चांगलच गाजत आहे. अधिवेशनात सध्या दिशा सालियन प्रकरण गाजत असून रश्मी शुक्ला यांच्यावरून राजकारण तापलं आहे. अधिवेशनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्षांबाबत बोलताना जयंत पाटलांनी असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप केला जात आहे. या मुद्द्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात सत्ताधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे.
नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं. त्यानंतर सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. या गदारोळात जयंत पाटील यांनी निर्लज्य शब्दाचा उच्चार केल्याचा दावा करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते पुरवणी मागण्यांवर भाषण करतील असे म्हणताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी हरकतीचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही चौथ्यांदा सभागृह तहकूब केले असेही विरोधकांनी म्हटले. यावेळी जयंत पाटील यांनी हे बरोबर नाही, तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका, असे म्हटले. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. आता जयंत पाटलांवर कुठली कारवाई होणार, त्यांचं निलंबन होणार की त्यांना केवळ समज दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.