जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनात निलंबन करण्यात आले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव शहरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या दडपशाहीविरोधात घोषणाबाजी करुन सरकारचा निषेध केला.
यावेळी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी म्हणाले, विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम हे घटनाबाह्य असुन शिंदे सरकार सातत्याने हेच करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनात बोलू नयेत. शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेचे प्रश्न मांडू नयेत. महापुरुषांच्या अपमानाविरुद्ध बोलू नयेत आणि बेळगाव सीमावादावरील लक्ष्य विचलित करण्याच्या हेतूने त्यांना सत्ताधाऱ्याच्या आग्रहाखातर या हिवाळी अधिवेशन समाप्त होण्यापर्यंत निलंबित करण्यात आल्याचे सांगितले.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार
या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरच्यावतीने शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत काळेफिती लावून व खोके दाखवून निदर्शने करण्यात आले. तसेच आकाशवाणी चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काही वेळ आंदोलन झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या. तद्नंतर पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. जयंतराव पाटील यांचे निलंबन मागे न घेतल्यास यापुढे अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी दिला.
आंदोलनात यांचा होता सहभाग
सदर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक महानगर अध्यक्ष रिकु चौधरी, महिला महानगर अध्यक्ष मंगला पाटील, लीलाधर तायडे, अमोल कोल्हे, राजू मोरे, पुरुषोत्तम चौधरी, इब्राहिम तडवी, मझहर पठाण, डॉ. रिझवान खाटीक, रमेश बहारे, रहीम तडवी, अशोक सोनवणे, विशाल देशमुख, जितेंद्र चांगरे, रफिक पटेल, अनिरुद्ध जाधव, चेतन पवार, सचिन साळुंखे, योगेश साळी, हितेश जावळे, धवल पाटिल, साहिल पटेल, भाला तडवी, सोहिल शेख, गणेश शिरसाठ, देशु शेख, झिशान शेख , राजा मिर्झा, नितिन जाधव आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.