जळगाव : शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थिनीस गेल्या दोन वर्षांपासून शाळेत बसू दिले नाही. त्यामुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान झाल्याची धक्कादायक घटना शहरातील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये घडली आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून, शिक्षण विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन संबंधित शाळेवर कारवाईची मागणी होत आहे.
कोरोनामुळे तब्बल दिड वर्षापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे मुलांची शाळेची फी भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने १५ टक्के फी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या नियमाच्या आडून शाळा पालकांची अडवणूक करीत असल्याचे प्रकार आता समोर येऊ लागले आहेत.
शाळेकडून फी भरण्याचा तगादा
शहरातील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकणारी आफरीन खान या विद्यार्थिनीस फी भरण्याच्या नावाखाली अडवणूक करण्यात आली आहे. या विद्यार्थिनीचे पालक फी भरण्यास तयार आहेत. मात्र शाळेकडून एकदाच पुर्ण फी भरण्याचा तगादा लावला जात आहे. परंतु कोरोनापासून आर्थिक परिस्थिती हालाखीची झाल्याने पुर्ण फी भरणे शक्य नाही. त्यामुळे शाळेने गेल्या दोन वर्षांपासून फी साठी तगादा लावला आहे. त्यामुळे विद्यार्थिनीस शाळेत बसण्यास मज्जाव केल्याने शैक्षणिक नुकसान झाले आहे. याकडे शिक्षण विभागाने गांभिर्यांने लक्ष देऊन संबंधित शाळेवर कारवाई करण्याची गरज आहे.