नवसारी: गुजरातमधील नवसारी येथे शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात कार आणि बसची जोरदार धडक झाली. यामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 32 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर वेस्मा गावाजवळ हा प्रकार घडला. बस चालकाला चालत्या वाहनात हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारला धडक दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यापैकी जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत आहेत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन्ही वाहनांच्या काचा फोडाव्या लागल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे जखमींपर्यंत मदत पोहोचण्यास थोडा विलंब झाला आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला
या अपघाताबाबत गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, गुजरातमधील नवसारी येथे झालेला रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या घटनेत ज्यांनी आपले कुटुंब गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. स्थानिक प्रशासन जखमींना तत्काळ उपचार देत आहे, मी त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.नवसारी डेप्युटी एसपी, व्ही.एन. पटेल यांनी सांगितले की, ही घटना आज सकाळी अहमदाबाद-मुंबई महामार्गाजवळ घडली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याला सुरतला हलविण्यात आले आहे.
अपघातानंतर बसचे नुकसान
सकाळी झालेल्या या अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात नेल्यानंतर पोलिसांनी दोन्ही वाहने क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला लावून वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, यासाठी पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
थंडीमुळे हार्ट अटॅकची भीती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात बसच्या चालकाला हृदयविकाराचा त्रास झाल्याचे समोर आले आहे. बस घेऊन निघताना तो स्वस्थ वाटत होता. मात्र शनिवारी सकाळी कडाक्याच्या थंडीमुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच नवसारी जिल्हा पोलीस प्रमुखांसह अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे.