पुणे: दारुच्या नशेत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना हॅपी न्यू इयर म्हणण्यावरुन झालेल्या वादात चौघांनी एका तरुणावर कुऱ्हाडीने वार करुन मनगटापासून हात तोडल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष अर्जुन माने (वय 24, रा. दुर्वांकूर, पंचवटी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र पंकज तांबोळी, साजीद शेख हे मेस बंद असल्याने साई चौकातील ईर्षाद हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यावर पहाटेच्या सुमारास ते हॉटेलबाहेर उभे होते. यावेळी मोटारसायकलवरुन दोघे जण आले. ते दारुच्या नशेत सर्वांना जबरदस्तीने हॅपी न्यू इयर म्हणत होते. त्यावरुन त्यांच्यात काही वाद झाला. तेव्हा त्यांच्यातील एकाने आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. त्याचे साथीदार आल्यावर पुन्हा वाद झाला. तेव्हा धक्काबुक्कीत एकाने पंकज तांबोळी यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार केला. त्यात पंकज याचा मनगटापासून हात तुटला. पंकजचा तुटलेला हात आणि रक्त पाहून ही मुले घाबरुन पळून गेली.
डॉक्टरांनी जोडला तुटलेला हात
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की, या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहचले. त्यांनी या तरुणाला जवळच्या दवाखान्यात नेले. डॉ. अवधूत यांनी पंकजचा रक्ताळलेला व तुटलेला हात घेऊन तो स्वच्छ करुन एका प्लॉस्टिकच्या पिशवीत टाकून त्याला तातडीने ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पाठविले. तेथील डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करुन तो पूर्ववत जोडला आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून गौरव गौतम मानवतकर (वय 20, रा. रा. तोंडे चाळ, सुतारवाडी पाषाण) याला अटक केली आहे.