जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटसह इतर प्राधिकरणांच्या निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. अशातच विद्यार्थी विकास मंडळाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करीत युवासेना व युवक काँग्रेस या संघटना आक्रमक झाल्या आहेत.
विद्यार्थी कल्याणचे विभागाचे प्रा. सुनील कुलकर्णी यांनी त्यांच्या विभागाच्या नियुक्त्या घोषित केल्या असल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा असे निवेदन दोन्ही संघटनांनी कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांना दिले आहे. प्रा. कुलकर्णी यांनी केलेल्या नियुक्त्यांना कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी मान्यता दिली आहे. शिक्षक संघटना, सिनेट, संस्थाचालक यांच्या निवडणूकीचा कार्यक्रम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संबधित नियुक्ती करून मतदारांना आमिष देण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न विद्यार्थी संघटनेच्या मार्फत निर्माण होतो आहे.
आचारसंहिता भंग केल्याचा आरोप
कुलगुरूंच्या भूमिकेबद्दल देखील प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सादर अभ्यासमंडळाच्या निवडणूकीत चोपडा येथील एक शिक्षक पॅनल मार्फत उमेदवार देखील आहे. त्यांनी नियुक्ती हा आचारसंहिता भंग असल्याचा आरोप संघटनांनी केली आहे. त्यामुळे प्रा. कुलकर्णी यांनी केलेल्या नियुक्ती त्वरित रद्द करण्यात यावा. प्रा. कुलकर्णी यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येते आहे. प्रा. कुलकर्णी हे अभवीपचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आली आहे. विद्यापीठ हे एखादया संघटनेची मक्तेदारी आहे का? असा सवाल विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून होत आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी अन्यथा युवासेना, युवक काँग्रेस येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन, उपोषण करेल. असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना युवासेना जिल्हा चिटणीस अंकित कासार, महानगर युवा अधिकारी अमोल मोरे, महानगर समनवयक महेश ठाकूर, उपमहानगर युवा अधिकारी आदित्य कोळी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे आदी उपस्थित होते.