मुंबई: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चित्र विचित्र कपडे परिधान करत मुंबईतील रस्त्यांवर फिरणाऱ्या उर्फी जावेदबद्दल मुंबई पोलिसात तक्रार केली आहे. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ‘उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा’ अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.
उर्फी जावेद ही नेहमी तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. उर्फीच्या या चित्रविचित्र फॅशनमुळे आता ती अडचणीत आली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चित्र विचित्र कपडे परिधान करत मुंबईतील रस्त्यांवर फिरणाऱ्या उर्फी जावेदबद्दल तक्रार केली आहे. यावेळी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्रही दिलं आहे. त्यात त्यांनी ‘उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी केली आहे याबद्दल चित्रा वाघ यांनी एक ट्वीटही केले आहे.
भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक
चित्रा वाघ यांनी पत्रात म्हटले, “उर्फी जावेद या अभिनेत्रीने भररस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमावर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उपड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कारवाई करावी, अशी भाजप महिला मोर्चाची मागणी आहे”, अशा आशयाचे पत्र लिहून चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर कारवाईची मागणी केली.