मुक्ताईनगर : चारशे कोटी रुपयांच्या गौण खनिज उत्खनन घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईटीएस पथक मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधी मंडळात एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांची दखल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली होती. तसेच या प्रकरणी महसूल विभागाकडून तपास केला जाईल, असं विखे पाटलांनी जाहीर केलं होतं. या सर्व घडामोडींनंतर आता अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्या जमिनीवर उत्खनन झालेलं क्षेत्र मोजण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी मुक्ताईनगरात दाखल झाले आहेत. विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावावर असलेल्या 33 हेक्टर 41 आर जमिनीवर उत्खनन करुन 400 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. तसेच त्यांनी या प्रकरणी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांचा आरोप काय?
“मंदाकिनी खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमीन खरेदी करण्यात आली. या जमिनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना म्हणजेच एनए प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे आधीच एनए झालेल्याल शेतीला पुन्हा कृषक करण्यासाठी जानेवारी 2019 मध्ये अर्ज सादर करण्यात आला. काही दिवसांनी प्रांताधिकाऱ्यांनी तात्काळ शेतीसाठी परवानगी दिली. त्यामुळे महसूल खात्याच्या आशीर्वादाने शालेय प्रयोजनासाठी असलेल्या या शेतीला पुन्हा कृषक करण्यात आले. यानंतर याच ठिकाणावरुन अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. या माध्यमातून येथून तब्बल 400 कोटी रुपयांचा घोळ झाला”, असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला होता.