जळगाव: राष्ट्रीय हरित लवादाने चायना मांजावर बंदी आणल्यानंतर देखील स्थानिक प्रशासनाकडून फारशी दखल घेतली जात नसल्याचे चित्र होते. पशु पक्षी आणि मानवाला देखील जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागत असल्याने सुज्ञ नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली, मुख्यमंत्र्यांकडे, केंद्र सरकारकडे तक्रारी केल्या. एका जनहित याचिकेत औरंगाबाद खंडपीठाने आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व जिल्ह्यातील प्रशासनास चायना मांजा विरोधात धडक कारवाई करण्याचे आणि विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
वन्यजीव संरक्षण संस्थेने देखील मुख्यमंत्री कार्यालयासह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मनपा प्रशासनास लेखी तक्रार देऊन न्यायालय आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आणून देत चायना मांजा विक्रेत्यांना तसेच चायना मांजा वापरून पतंग उडवणाऱ्या पतंग बाजांवर फौजदारी कारवाई करावी आणि विक्रेत्यांना एक लाख रुपये पर्यंत दंड करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर वन्यजीव संरक्षण संस्थेच्या शिष्टमंडळाने महापौर जयश्री महाजन यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. याची दखल घेत महापौर जयश्री महाजन, साहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या आदेशाने गेल्या 2 दिवसापासून मनपा प्रशासनाने चायना मांजा विरोधात धडक मोहीम उघडली आहे.
जनजागृती मोहिमेत यांचा सहभाग
वन्यजीव संरक्षण संस्थेने देखील चायना मांजा विरोधात जनजागृती प्रबोधन मोहीम सुरू केली असून मांजा आणि पतंग विक्रेत्यांना भेटून चायना मांजाचे दुष्परिणाम काय आहेत याची माहिती देण्यात येत आहे. तसेच या कालावधीत सर्वसामान्य जनतेने काय काळजी घ्यायला हवी याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेची सुरवात आज हरीविठ्ठल नगर पासून करण्यात आली. जनजागृती मोहिमेत संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, रवींद्र सोनवणे, सचिव योगेश गालफाडे, जगदीश बैरागी, राहुल सोनवणे, राजेश सोनवणे, निलेश ढाके, रवींद्र भोई, कृष्णा दुर्गे, प्रसाद सोनवणे , चेतन भावसार, पंकज सुर्यवंशी, अरुण सपकाळे, फ्रेंडस ऑफ एनिमलचे योगेश वानखेडे हे परिश्रम घेत आहेत.
वन्यजीव संस्थेने केले आवाहन
पतंगोत्सव काळात मोटारसायकलवर वावरताना गळ्यात मफलर किंवा रुमाल बांधा, आपल्या मुलांना चायना मांजा वापरू देऊ नका, पतंग उडवताना हातात हातमोजे वापरा. चायना मांजाचा वापर किंवा विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यास त्यांना समज द्या, किंवा जवळच्या पोलीस स्टेशन, महानगरपालिका किंवा वन्यजीव संरक्षण संस्थेस माहिती द्या. जखमी पक्षी आढळून आल्यास वनविभाग हेल्पलाईन 1926 किंवा जवळच्या पक्षीमित्रांना बोलवा असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.