जळगाव : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी सुरू असतानाच जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीवरून कारमधून वाहतूक होणार पावणेतीन लाखांचा गुटखा जप्त करीत एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव शहरातील तांबापुरा येथील शेख इम्रान शेख जहुरोद्दीन हा चारचाकी (एम.एच. 19 ए.एक्स 3510) मधून जळगाव ते भुसावळ महामार्गाने मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजनपाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक गणेश चौभे, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने जळगाव भुसावळ महामार्गावर टोलनाक्याजवळ सापळा रचला.
नशिराबाद पोलिसात गुन्हा
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित क्रमाकांची कार आल्यावर तिची तपासणी केली असता, कारमधून दोन लाख 75 हजार 264 रुपयांचा विमल पान मसाला व तंबाखू मिळून आला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अन्न औषधी विभागाच्या माध्यमातून कारवाई करत याप्रकरणी शेख इम्रान शेख जहुरोद्दीन यांच्याविरोधात गुरुवारी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.