कासारगोड : विषारी अन्नाचे सेवन केल्यामुळे एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. या तरुणीने एका स्थानिक हॉटेलमधून ऑनलाईन ऑर्डर करून बिर्याणी मागवली होती. ही बिर्याणी खाल्याने तिला विषबाधा होऊन तिचा मृत्यू झाला आहे. आता केरळ सरकारने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.
अंजू श्रीपार्वती असे या युवतीचे नाव असून त्यांनी 31 डिसेंबर रोजी केरळमधील कासारगोड येथील एका रेस्टॉरंटमधून ऑनलाईन बिर्याणी ऑर्डर केली होती. ती खाल्ल्यानंतर तिला त्रास सुरु झाला आणि हॉस्पिटलमध्ये उपचारावेळीच तिचा मृत्यू झाल्याचे समजते.
उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू
बिर्याणी खाऊन त्रास झाल्यानंतर या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर तेथून त्तिला कर्नाटकातील मंगळुरू येथील दुसऱ्या रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला असून आता अन्न सुरक्षा आणि स्टॅंडर्ड कायद्यांतर्गत (FSSA) अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप असलेल्या संबधित हॉटेलचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.
आरोग्य मत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
दरम्यान केरळ राज्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी घटनेचा संपूर्ण अहवाल लवकरात लवकर देण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच या युवतीच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.