मुंबई : राज्यात शिवसेना पक्षात मोठी बंडखोरी झाली. या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात उघड-उघड दोन गट पडले. या बंडखोरीनंतर शिंदे गटाने आमचीच शिवसेना खरी असून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरदेखील दावा केलेला आहे. याच वादावर येत्या 12 जानेवारीपासून निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सुनावणीदरम्यान निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या सुनावणीसाठी शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गटाचे सर्व आमदार आणि खासदार दिल्लीत निवडणूक आयोगासमोर हजर असतील. प्रत्येक आमदार आणि खासदाराची ओळखपरेड करुन निवडणूक आयोग चिन्हासंदर्भात निर्णय घेईल.
सुप्रीम कोर्टातही होणार सुनावणी
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगापाठोपाठ सुप्रीम कोर्टातही महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात 10 जानेवारीला महत्त्वाची सुनावणी होणार आहे.
निकालाकडे लागलंय लक्ष
संबंधित प्रकरण कोर्टाकडून लिस्ट करण्यात आलं आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे याबाबत सुनावणी होणार आहे. ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांचे वकील निवडणूक आयोगासमोर या दिवशी युक्तिवाद करतील. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं होतं. तसेच दोन्ही गटांना वेगळी नावं देण्यात आली होती. आता येत्या 12 जानेवारीला शिवसेनेवर कुणाचा दावा प्रबळ ठरतोय, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.