मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका फोनने मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे. मुंबई पोलीस कंट्रोल रुमला यासंबंधी एक धमकीचा फोन आला होता. मुंबईत 1993 सारखे बॉम्ब ब्लास्ट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईत माहिम, भेंडी बाजार, नागपाडा, मदनपुरा परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी या कॉलद्वारे देण्यात आली आहे.
एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून शहरातील अनेक भागात बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. 1993 च्या धर्तीवर मुंबईत ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे अज्ञात व्यक्तीने फोन करून सांगितले आहे. यामुळे मुंबई पोलीस खात्यातील सगळ्याच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.
महाराष्ट्र एटीएसला दिली माहिती
फोन करणाऱ्याने पोलिसांना सांगितले की, शहरात दंगल घडवण्यासाठी इतर राज्यातून बऱ्याच लोकांना बोलावण्यात आले आहे. या फोननंतर मुंबई पोलिसांची धावपळ उडाली. दरम्यान महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाला याबाबत माहिती देण्यात आली. या माहितीनंतर मुंबई एटीएसकडून कारवाई केली आहे.
संशयिताला केली अटक
मुंबईतील अनेक भागात बॉम्बस्फोट करण्याची माहिती फोनवरून मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएसची टीमही सक्रिय झाली. एटीएसने एकाला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एटीएसने आरोपीला मुंबईतील मालाड भागातील पठाणवाडी येथून ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींना पुढील चौकशीसाठी आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती आहे.