चाळीसगाव : लग्न करणे सोपे आणि नंतर विवाह प्रमाणपत्र मिळविणे अवघड अशी परिस्थिती सध्या चाळीसगाव शहरात निर्माण झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने पालिका कार्यालयातील विवाह नोंदणी बंद करुन हे काम वैद्यकिय अधीक्षकांकडे सोपवले आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही अनेक दिवस प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
अलीकडे अनेक ठिकाणी लग्न प्रमाणपत्राची मागणी केली जाते. कायद्याच्या दृष्टीनेही हे प्रमाणपत्र महत्त्वाचे असते. लग्न झाल्यानंतर विविध कागदपत्रांसह मनपाच्या वॉर्ड कार्यालयात अर्ज दाखल करावा लागतो. शहरात पालिकेचे कार्यालय आहे. विवाह नोंदणीसाठी संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केलेली होती. पालिकेने लग्न प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे. मात्र आता अचानक मुख्याधिकारी यांनी विवाह नोंदणीचे काम बंद केल्याने नागरिकांना चकरा माराव्या लागतात.
२०१३ पासून NUHM चे काम दवाखान्याकडे
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) दवाखाना हा आरोग्य विभाग आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त नियंत्रणाखाली असलेली आस्थापना असून, शहरातील नागरिकांच्या गरजांविषयी आणि आरोग्य विषयीक मूलभूत सुविधांसाठी कार्यान्वित केलेली यंत्रणा आहे. चाळीसगाव नगरपरिषद सरकारी दवाखाना (श्री. अनीलदादा देशमुख मुन्सिपल डिस्पेन्सरी) चे सर्व कार्यक्रम आणि कामकाज २०१३ पासून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) दवाखान्या मार्फत बघितले जाते.
पाच वर्षांची प्रक्रिया खंडीत
२०१६ सालापासून विवाह नोंदणी NUHM दवाखान्यातून प्रमाणित करून चाळीसगाव नगरपालिका येथे अंतिम प्रमाणपत्र मिळत होते. मागील ५ वर्षाहून अधिक चाललेल्या या प्रक्रियेत कुठलीही ठोस बदलाचे आदेश नसताना ऑक्टोबर २०२२ पासून NUHM आणि नगरपालिका यांनी परस्पर स्वतः निर्णय घेऊन विवाह नोंदणी बंद केलेली असून नागरिकांचे हाल होत आहेत.