जळगाव: जळगाव शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आता विकासकामांसाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
जळगाव शहरात विकास कामे रखडली आहेत. रस्त्यांच्या कामांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा ओरड केली जात असून याची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांसाठी २०० कोटींचा निधी मिळाला आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये झाला निर्णय झाला.राज्यातील मोठ्या मक्तेदाराला काम दिले जाणार असून, सहा महिन्याच्या आत काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
जळगावकरांना मिळणार दिलासा
या बैठकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सोनवणे, जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या निधीतून विकासकामांना गती मिळणार असल्याने जळगावकरांना दिलासा मिळणार आहे.