खामगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महिलेच्या प्रसूती दरम्यान सिझेरियन करतांना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती करतांना महिलेच्या पोटातच कापसाचा बोळा राहिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील कवठळ येथे घडली आहे. या प्रकाराने जिल्ह्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहिती नुसार पूजा पाखरे या महिलेची खामगावच्या सामान्य रुग्णालयात ७ एप्रिल रोजी प्रसूती झाली. परंतु पूजाचे पोट दुखत असल्याने तिला ११ एप्रिल ला अकोल्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १० जून ला तिच्यावर खामगावच्या डॉ. अरविंद पाटील यांच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता पोटात बँडेज च्या पट्टीचा बोळा आढळला. त्यामुळे तिच्या पोटात संसर्ग होऊन वेदना वाढल्या होत्या. मोताळ्याचे डॉ. शरद काळे यांनी शस्त्रक्रिया करून हा बोळा बाहेर काढला. मात्र तिची झुंज अपयशी ठरली आणि तिने जगाचा निरोप घेतला. दरम्यान खामगावच्या सामान्य रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा बळी गेला. या प्रकरणी संबंधितांची चौकशी करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.