जळगाव : राज्यात जळगाव हॉटसिटी म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात उन्हाळ्यात सुर्य आग ओकत असल्याने सर्वाधिक तापमानाची नोंद होते. मात्र यंदा जिल्ह्यात प्रथमच राज्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंदी झाली आहे. तापमानाचा पारा 5 अंशांवर घसरला आहे. थंडीमुळे जिल्हा कमालीचा गारठला आहे, कमाल तापमानही 28 अंशापर्यत आले आहे. राज्यात जळगाव शहराचे सर्वाधिक कमी तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे महाबळेश्वर पेक्षाही जळगाव थंडाथंडा कुलकुल झाले आहे.
जळगाव शहराच्या तापमानात गेल्या तीन-चार दिवसापासून कमालीची घट झालेली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा लाट असल्याने गार वार्यांमूळे जळगाव जिल्ह्यातील गारठा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे जळगाव शहराचे तापमान 5 अंश सेल्सीअस झाले आहे. जळगावात नववर्षाची सुरुवात होताच थंडीत वाढ होवून थंडीची लाट वाढली आहे. येत्या दोन-तीन दिवसात थंडीचा गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज ममुराबाद वेध शाळेने वर्तवीला आहे. तब्बल 21 वर्षांनंतर जळगावला सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.
तीन दिवसांपासून गारठा कायम…
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट महाराष्ट्राकडे वळल्याने राज्यात हुडहुडी वाढली आहे. उत्तर भारतातून येणार्या अतिथंड वारे खान्देशात शिरत असल्याने जिल्ह्यांमधील तापमानात मोठी घट नोंदविण्यात आली आहे. येत्या ४८ तासांत जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता आहे. यंदा जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात नीचांकी पाच अंश तापमान नोंदवले गेले. जळगावात रविवारी १० अंश सेल्सिअसवर असलेला पारा सोमवारी अवघ्या पाच अंशांवर आला. मंगळवारीही पहाटेपासून गारठा कायम आहे. यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच तापमानात एवढी घसरण झाली.