जळगाव : वाळू उपशावर बंदी असूनही जिल्ह्यात चोरट्या पध्दतीने वाळूउपसा आणि वाहतूक सुरू आहे. अवैध वाळू रोखण्याच्या नावाखाली महसूल विभागाकडून हप्तेखोरी होऊ लागल्यामुळे वाळू व्यावसायिकांची अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्लेही केले जातात. एका बड्या अधिकाऱ्यांसोबत वाळू माफीयाचा संवाद झाल्याची क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. यामुळे हप्तेखोरी सुरु असल्याचे उघड झाले आहे. या वाळू चोरांना चाप लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आधी आपल्याच प्रशासनातील अधिकाऱ्यांना वठवणीवर आणण्याची गरज आहे.
प्रशासनाकडून होत असलेल्या हप्तेखोरीचा सामान्य नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. वाळूच्या प्रकरणात अनेक अधिकाऱ्यांनी कोट्यवधीची माया जमवली आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या संपतीची चौकशी केली जावी, अशी मागणी सामान्य नागरीक करत आहेत. महसूल प्रशासनाकडून प्रत्येक वर्षी वाळू पट्टयाचे कायदेशीर लिलाव केले जातात. ठेका घेणाऱ्या ठेकेदाराकडून शासनाचा महसूल भरून घेतला जातो. मात्र इथं कायदेशीरपेक्षा बेकायदेशीर वाळू उपशाला कार्यालयातील अधिकारी हेतूपुरस्कर परवानगी देतात. यातूनच हप्तेखोरीचा जन्म होत आहे.
जिल्हाधिकारी काय कारवाई करणार?
या क्लिपमध्ये थेट आर्थिक देवाणघेवाणीचा संवाद आला आहे. महसूलमध्ये वरच्या साहेबापर्यंत ते खालच्या पर्यंत सर्वच अधिकारी संशयाच्या फेऱ्यात आले आहे. एकूण एक लाख रुपये हप्ता देण्याची देखील भाषा उघडपणे झाली आहे. या प्रकरणामध्ये जळगाव तहसील कार्यालयातील दोन लिपिकांचा देखील समावेश असल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत चौकशी केल्यास संपूर्ण प्रकरण उघडकीस येणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन काय कारवाई करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हप्तेखोरीमुळे संपला वचक
वाळू माफियांवर जिल्हा प्रशासनाचा वचकच कमी झाल्याने ते मुजोर झाले आहेत. याला प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची लाचखोरीही तितकीच कारणीभूत आहे. अवैध वाळू वाहतूक व उत्खननावर कारवाईचे अधिकार तहसीलदारांना आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी तहसीलदार कारवाईसाठी उपलब्ध असतील, असे नाही. पण, काहीवेळ त्यांच्या हाताखालील तलाठी, मंडलाधिकारी, कोतवाल, नायब तहसीलदारांपर्यंतचे अधिकारी अवैध वाळू व्यवसायावर कारवाई करायला गेल्यावर त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार होतात. हे अधिकारी व कर्मचारी नेमकी कारवाई करायला जातात की हप्ते वसुलीला जातात, यातूनच हे हल्ले होत असल्याची चर्चा आहे.