जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा सुनील कुलकर्णी यांच्या बेकायदेशीर नियुक्तीचा वाद चांगलाच पेटलाय आहे. महाविकास आघाडीने विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.सुनील कुलकर्णी यांच्या दालनालाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विकास विभाग नावाचे फलक लावून त्याचे नामकरण करीत निषेध केला.
कुलगुरू डॉ विजय माहेश्वरी यांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते की प्रा. सुनील कुलकर्णी हे सध्या भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जळगाव विभाग या पदावरती कार्यरत आहेत. एका राजकीय पक्षाशी व संघटनेशी संबंधित किंवा त्या पदावरती असलेल्या व्यक्तीला विद्यापीठ म्हणजेच शासनाच्या कुठल्याही अधिकारी पदावरती नेमता येत नाही. परंतु विद्यापीठ प्रशासनाने सर्व नियम धाब्यावरती बसवत, एका राजकीय पदाधिकाऱ्याची विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून नियुक्ती केली.
राजकीय पदाधिकाऱ्याची नियुक्ती अयोग्य
निवेदनानंतर तीन ते चार वेळेस कुलगुरू महोदयांशी चर्चा केल्यानंतर देखील प्रा. डॉ. सुनील कुलकर्णी यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे पदावरतून हटवण्यात आलेले नाही. त्यामुळे कुलगुरू यांना दिलेल्या दोन दिवसाच्या अवधीनंतर आज विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.सुनील कुलकर्णी यांच्या दालनालाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विकास विभाग नावाचे फलक लावून त्याचे नामकरण करण्यात आले व विद्यापीठ प्रशासनाने एका राजकीय पदाधिकाऱ्याला अद्यापही पदावरती अजूनही नियुक्त केलेले आहे त्याचा देखील जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलनात यांचा होता सहभाग
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक गुलाबराव वाघ, शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, राष्ट्रवादीचे कुणाल पवार,युवा सेना जिल्हा प्रमुख नीलेश चौधरी, भूषण भदाणे, पियुष गांधी, महेश ठाकूर, अमोल हडपे, अमित जगताप, अमोल मोरे, सचिन पाटील, अंकित कासार, शुभम पाटील आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.