मुंबई : सध्या वातावरणातील बदलामुळे लहान मुलांमध्ये सर्दी-खोकल्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पालक आपल्या मुलांना खोकल्याचं औषध देतात. परंतु खोकल्याचं औषध मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. या औषधांचा दुष्परिणाम लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दोन भारतीय खोकल्याच्या सिरपला बंदी घातली आहे.
उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील मेरियन बायोटेक या कंपनीने बनवलेल्या दोन कफ सिरपमुळे उझबेकिस्तानमधील 19 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं भारतीय कफ सिरपच्या वापराबाबत इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) उझबेकिस्तानच्या अनेक वरिष्ठ अधिकार्यांच्या संपर्कात असून या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली जात आहे. नोएडास्थित कंपनी मेरियन बायोटेकनं बनवलेले दोन कफ सिरपचा वापर करणं टाळावं, अशा इशारा डब्ल्यूएचओनं दिला आहे.
गुणवत्तेची हमी दिलेली नाही
उझबेकिस्तान सरकारनं नोएडास्थित मॅरियन बायोटेकचं खोकल्यावरील सिरप ‘डॉक-1 मॅक्स’ला मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं आहे. आतापर्यंत मॅरियन बायोटेकनं डब्ल्यूएचओला या उत्पादनांच्या सुरक्षिततेची आणि गुणवत्तेची हमी दिलेली नाही, असं सांगितलं जात आहे.
भारत सरकारने तपास सुरू केला
उझबेकिस्तानमधील 19 मुलांचा मृत्यू भारतीय कफ सिरपमुळेच झाल्याचा दावा वारंवार केला जात आहे. आता भारत सरकारनंही याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या सूत्रांनी सांगितले होते की, हे सिरप सध्या भारतीय बाजारात विकलं जात नाही. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, यूपी ड्रग कंट्रोलर आणि सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननं या प्रकरणी तपास सुरू केला आहे. सिरपचे नमुने चंदीगढला पाठवण्यात आले आहेत.