नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघात मोठा ट्विस्ट आला आहे. काँग्रेसने या निवडणुकीत पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाकडून सुधीर तांबे यांच्यासाठीचा एबी फॉर्म देखील जारी करण्यात आला. पण आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करुन आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ. सुधीर तांबे यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. “सत्यजित तांबे युवा उमेदवार असून त्यांना उमेदवारी मिळायला हवी अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही याबाबतची कल्पना आहे. सत्यजित तांबे यांनाच उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस नेत्यांचंही म्हणणं होतं पण काही तांत्रिक चुकीमुळे आणि संवादातील त्रुटीमुळे एबी फॉर्म वेळात पोहोचू शकलेला नाही”, असं कारण डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी दिलं आहे.
भाजपने ठरवून केली खेळी?
काँग्रेसचा एबी फॉर्म दाखल न करता सत्यजीत तांबे अपक्ष उमेदवार अर्ज दाखल झाला तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षातर्फे सुध्दा कोणालाच एबी फॉर्म देण्यात आलेला नाही. त्यामुळे आजच्या परिस्थितीत या मतदार संघात कोणत्याही पक्षाचा उमेदवार नाही, आता सर्व उमेदवार अपक्ष आहेत. भाजपतर्फे ही ठरवून करण्यात आलेली खेळी असल्याचे सांगण्यात येत आहे.