पाळधी : आज या असुरक्षिततेच्या काळात आपले रक्षण कुणी दुसरा करील, या आशेने दुर्बल आयुष्य जगण्यापेक्षा आपण राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे धर्माचरण करणे आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सायली पाटील यांनी केले.
राजमाता जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त समितीच्या वतीने पाळधी येथील श्रीराम मंदिराच्या सभागृहात आयोजित रणरागिणी मेळाव्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनाही मार्गदर्शन करण्यास आमंत्रित केले होते.
जिजाऊप्रमाणे धर्माचरण करा- क्षिप्रा जुवेकर
राजमाता जिजाऊ यांनी स्वतः आयुष्यभर धर्माचरण केले आणि आपल्या पुत्राला ही धर्माचरण करण्याचे मार्गदर्शन केले. त्यांनी शिवरायांना सर्व प्रजेचे दुःख दूर करणे आणि प्रजेच्या रक्षणासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे ध्येय दाखवले. त्यांच्याप्रमाणे प्रत्येक महिलेने धर्माचरण केल्यास महिला या कलियुगातील कठीण प्रसंगांना सक्षम पणे सामोऱ्या जाऊ शकतात. या मेळाव्याचे सूत्रसंचालन पाळधी येथील कुमारी. तेजस्विनी कौतिक माळी आणि कु. धनश्री दहिवदकर यांनी केले. तसेच प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके कु. निकिता माळी, कु, खुशी माळी आणि कु. लीना पाटील यांनी करून दाखवली.