पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत एक मोठा अनर्थ होता होता टळला. पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. यानंतर दीपप्रज्वलन करत होत्या. त्यावेळी त्यांच्या साडीला आग लागली. सुदैवाने यामध्ये त्यांना कुठलीही इजा झालेली नाही.
पुण्यातील हिंजवडीच्या कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ही घटना घडली. यावेळी टेबलावर ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर तिथं ठेवलेल्या समईमुळे सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात त्यांच्या साडीच्या पदराला आग लागल्याचं दिसत आहे. सुदैवाने यात सुप्रिया सुळे यांना कुठलीही हानी झाली नाही आणि तात्काळ आग विझविण्यात आली.
सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया
या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, थोड दुर्देव होतं बाकी काही नाही. थोडक्यात वाचले, सगळे आम्ही मुळशीला कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाला गेलो होतो. यावेळी तिथे मेनबत्ती होती. त्यातूनच माझ्या साडीने पटकन पेट घेतला. ते आमच्या लगेच लक्षात आलं. त्यानंतर सलग कार्यक्रम होते. त्यामुळे कपडे बदलायला वेळ मिळाला नाही. आमचे हितचिंतक, नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की, मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे”, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.