जामनेर : स्वस्त धान्याची गोदामात साठवणूक केल्याच्या संशयातून फत्तेपूर शहरातील भुसार मालाचे व्यापारी नाना इंगळे यांच्या तीन गोदामांना प्रशासनाने सील लावल्याने खळबळ उडाली आहे.
व्यापारी इंगळे यांच्या गोद्री रस्त्यावरील घराजवळ असलेल्या गोदामात धान्य उतरवले जात होते. हे धान्य रेशनचे असल्याच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी घटनास्थळ गाठले तर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी पुरवठा निरीक्षक वैराडकर व कर्मचारीदेखील दाखल झाले. या गोदामासह धामणगाव रोडवरील दोन गोदामे प्रशासनाने सील केली असून गोण्यांमधील धान्याचे नमुने घेण्यात आली आहेत.
अहवालाअंती होणार कारवाई
तिन्ही गोदामात गहू, तांदूळ, तूर, मका अशा स्वरूपाचे तब्बल तीन टन धान्य असून हा माल शेतकर्यांकडून घेतल्याच्या पावत्या आपल्याकडे आहेत, अशी माहिती व्यापारी नाना इंगळे यांनी दिली. दरम्यान, याबाबत अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसून धान्य रेशनचे आहे किंवा नाही याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.