जळगाव : राज्याच्या राजकारणात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकात सुरू आहेत. काल महाविकास आघाडीचे उमेदवार नॉटरिचेबल झाले होते. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे नॉटरिचेबल असल्याची बातमी समोर आली आहे. एकनाथ खडसे गेल्या ८ दिवसांपासून नॉच रिचेबल आहेत. त्यामुळे, खडसे समर्थक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी फोनवर सहज उपलब्ध असणारे आमदार एकनाथ खडसे काही दिवसांपासून गायब आहेत. त्यांचा फोनदेखील लागत नसल्याची तक्रार सामान्य कार्यकर्ते करत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या ५ ते ६ दिवसांपासून कुठल्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क झालेला नाही. त्यांचे दोन्ही फोन नंबर्स नॉट रिचेबल असल्याचं समजतंय. सर्वसामान्यांचा केव्हाही फोन रिसिव्ह करणारे मात्र पहिल्यांदाच नॉट रिचेबल झाल्याने खडसे समर्थक संभ्रमात पडले आहे.
एकनाथ खडसे मुंबईत?
एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला असून आठ दिवसापूर्वी एकनाथ खडसे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात मुंबईला गेले होते. दरम्यान त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क देखील झाला होता मात्र गेल्या पाच ते सहा दिवसापासून एकनाथ खडसे यांचा मोबाईल बंद असल्याने कार्यकर्त्यांशी देखील त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. एकनाथ खडसे यांचे विश्वासू अशोक लाडवंजारी यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की नाथाभाऊ हे आजारी असल्याने मुंबईत उपचार घेत आहेत. रूग्णालयात पायाच्या दुखण्याशी संबंधीत उपचार करण्यात आल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीमध्येही एकनाथ खडसे नाराज?
आमदार एकनाथ खडसे यांनी कन्या रोहिणी खडसेंसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये खडसेंना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा देखील रंगली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना विधान परिषदेत स्थान देण्यात आले. मात्र राष्ट्रवादीतही फार मोठी संधी न मिळाल्याने खडसे नाराज असल्याचे बोलले जात आहे.