अमळनेर: शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तरूणाच्या अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याने जखमी झालेल्या शेतकऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयवंत यशवंत कोळी (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त नातेवाईकांनी दोषींवर कारवाईसाठी मृतदेह थेट अमळनेर तहसील कार्यालयात आणल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे भाल्या नाला परिसरात शेती असलेले जयवंत यशवंत कोळी (वय ३६) हे रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. सकाळी त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर नेल्याने ते गंभीर जखमी झाल्याची माहिती एकाने कळवली. यानंतर नातेवाईक आणि इतर लोकांनी प्रथम स्थानिक डॉक्टरांकडे उपचारसाठी नेले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे नेल्यावर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
वाळू वाहतूकदारांशी झाले होते वाद
दरम्यान दोन दिवसांपूर्वी जयवंत कोळी यांनी अवैध वाळू वाहतूकदारांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून वाद निर्माण झाले होते. तक्रारी करूनही महसूल खात्याचे अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याने जयवंतचा जीव गेल्याची तालुक्यात चर्चा आहे.