पुणे : विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात अतिशय धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. सुनेच्या डोक्याला पिस्तूल लावून मानवी हाडाची पावडर खायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकाराची राज्य महिला आयागाने तातडीने दखल घेतली असून पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
घरामध्ये सुख शांती नांदावी, भरभराट व्हावी आणि मुल बाळ व्हावं यासाठी पतीसह सासू सासऱ्यांनी महिलेची अघोरी पूजा केली. हा प्रकार पुणे शहरातील धायरी भागात 2019 पासून सुरू होता. पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मृत माणसाची हाडे, घुबडाचे पाय, कोंबडीच्या धडाची अघोरी पूजा करून त्याची राख विवाहितेस खायला घातल्याच्या प्रकाराची राज्य महिला आयागाने तातडीने दखल घेतली आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करून त्याचा अहवाल आयोगासमोर सादर करण्याचा आदेश आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्याला दिला आहे.
महिलेने घेतली पोलिसांत धाव
एका अमावस्येच्या दिवशी रात्री सर्वजण जवळच्या स्मशानभूमीमध्ये गेले. तिथे जळालेल्या मृतदेहाची काही हाडे गोळा केली आणि राख मडक्यात घेतली. ते सर्व घरी आणून त्याची पूजा केली. मडक्यातील राख पाण्यामध्ये टाकून ते पाणी फिर्यादीला पिण्यासाठी दिलं. यानंतर फेबुवारी 2021 मध्ये जावेच्या निगडी येथील घरी पूजा करण्यात आली. त्यासाठी मृत माणसाचे केस, हाडे, घुबडाचे पाय आणि कोंबडीचे धड हे सर्व जावेच्या आईवडिलांनी आणून ठेवलं. मांत्रिक महिलेनं अघोरी पूजा केली. त्यानंतर हाडाची पावडर करून ती फिर्यादीला खायला सांगितली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सासरच्या जाचाला कंटाळून अखेर या महिलेने पोलिसांत धाव घेतली. याबाबत पती जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव अशी आरोपींची नावं आहेत. या सर्वांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.